कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्णांपैकी तब्बल १२ जण करोनातून बरे झाले आहेत. त्यातील आठ जणांना मंगळवारी घरीही पाठवण्यात आले. उर्वरित चार जणांनाही लवकरच रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार आहे. करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे या १२ रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णांची दुसरी चाचणी मंगळवारी निगेटिव्ह आली. यापैकी आठ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतरही पुढे सलग चौदा दिवस या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना घरातच विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
'करोनाला हरवणार'
'मी घरी थांबणार, मी करोनाला हरवणार' हा पण आपण सगळ्यांनी करू या, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या वेळी राज्यातील जनतेला केले. 'बुधवारी गुढी पाडवा आहे. या निमित्ताने करोनावर मात करण्याचा, या विषाणूविरुद्धच्या लढाईत विजय मिळवण्याचा संकल्प करूया,' असेही त्यांनी नमूद केले. राजेश टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून मंगळवारी राज्यातील जनतेला संबोधित केले. रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण बरे होत आहेत, ही समाधानाची बाब आहे. सध्या दोनच करोनाबाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, बाकी सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.